१४ हजार फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाई; रेल्वे प्रशासनाने केला ६५ लाखांचा दंड वसूल

Foto
औरंगाबाद : रेल्वेने प्रवास करणार्‍यांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच उन्हाळी सुटी असल्यानेही रेल्वेप्रवाशांची संख्या वाढलेली आहे, परंतु यात सर्वाधिक तिकिट न काढणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. नांदेड विभागांतर्गत चालविण्यात येणार्‍या रेल्वेमध्ये एका महिन्यात १४ हजार ३९० प्रवाशांनी तिकिट न काढताच रेल्वेने प्रवास केला आहे. 

रेल्वेने प्रवास करणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक आहे, परंतु प्रवाशांच्या तुलनेत टीसीची तिकिट तपासणी संख्या, तुटपुंजी आहे. त्यामुळे प्रत्येक डब्यातील प्रवाशांच्या तपासणी केली जाते असे नाही. याचाच फायदा काही प्रवासी घेत आहेत. तिकिट न काढताच प्रवासी प्रवास करत आहेत. एप्रिल महिन्यात नांदेड, जालना, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, सेलू, लासूरसह आदी ठिकाणी तब्बल १४ हजार ३९०0 प्रवाशांनी रेल्वे तिकिट न काढताच प्रवास केला असल्याची माहिती समोर आली आहे. 

६५ लाख रुपयांचा दंड वसूल 
रेल्वे प्रशासनाने केलेल्या तपासणीत १४ हजार ३९० प्रवासी विनातिकिट प्रवास करताना आढळून आले आहेत. या प्रवाशांवर रेल्वेने दंडात्मक कारवाई करून तब्बल ६५ लाख रुपयांचा दंड रेल्वे विभागाने वसूल केला आहे. 

प्लॅटफॉर्म तिकिट न काढणार्‍यांचे काय?
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणार्‍यांचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम रेल्वेच्या उत्पन्‍नावर होत आहे. विनातिकीट प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी टीसींची संख्या वाढविण्याची गरज आहे. 
इतकेच नव्हे तर औरंगाबाद रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म तिकिट न काढताच अनेक जण प्रवेश करतात. याकडे मात्र रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्लॅटफॉर्म तिकिट काढले की नाही,  याची तपासणीही केली जात नाही. त्यामुळे कुणीही सहज रेल्वेस्थानकात प्रवेश करत आहे. मोबाईल चोर, पॉकेटमारही याचा फायदा घेत आहेत. याकडे गांभीर्याने बघत नाही. यामुळे सुरक्षेचाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. याकडे रेल्वे विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.